रौप्य महोत्सव उद्घाटन


११ डिसेंबर २०१६ रोजी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत हर्षोल्हासात संपन्न झाले. या समारंभास उद्घाटक म्हणून लातूरचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकिशन सोमाणी यांचे नातू, महाराष्ट्रातील ख्यातकीर्त हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षल लाहोटी हे उपस्थित होते. या समारंभाच्या निमित्ताने संस्थाध्यक्ष डॉ. चेतन सारडा, संस्थाउपाध्यक्ष तेजमल बोरा व प्रकाश कासट, संस्थापूर्वाध्यक्ष रमेश राठी व शांतिलाल कुचेरिया, प्राचार्य कन्हैय्यालाल पुरोहित, संस्थासचिव कमलकिशोर अग्रवाल, सहसचिव सुभाष कासले, कोषाध्यक्ष जयेश बजाज, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. मधुकर कुलकर्णी, संस्थासदस्य व रौप्य महोत्सवाचे संयोजक अतुल देऊळगावकर, संस्थेचे भूतपूर्व संचालक मंडळ आणि प्रशाला प्रमुख सुभाष मिश्रा, विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, पालक, निमंत्रित, नागरिक, पत्रकार व विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभास डॉ. हर्षल लाहोटी यांचे माता-पिता व विद्यालयाची पहिली विद्यार्थिनी श्रद्धा भोसले यांची विशेष उपस्थिती होती. या समारंभात विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना ब्लेझरची स्नेहपूर्वक भेट देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून कु. आकांक्षा तडोळे हिने वैयक्तिक, तर इतर विद्यार्थिनिंनी समूहनृत्य सादर केले.