स्व. श्री. श्रीकिशनजी सोमाणी स्व. डॉ. रामगोपालजी सारडा स्व. श्री. नंदकिशोरजी भार्गव
आमचे श्रद्धास्थान संस्थापक अध्यक्ष संस्थापक सचिव

२७ डिसेंबर १९९२ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. रामगोपालजी सारडा, संस्थेचे संस्थापक सचिव स्व. नंदकिशोरजी भार्गव आणि त्यांचे इतर सहायक यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणे, हा मूळ उद्देश साकार करण्यासाठी अभिनव मानव विकास संस्थेची स्थापना सन १८६० च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. २१ व सन १९५० च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. २९ मधील तरतुदींनुसार केली. (नोंदणी क्र.- एफ २९०२) या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करून संस्कारक्षम नागरिक घडविण्याच्या उद्देशाने जून १९९३ साली श्रीकिशन सोमाणी प्राथमिक विद्यालयाची सुरुवात केली.

या विद्यालयात सुरुवातीस प्राथमिक विभागात इयत्ता बालवाडीपासून ४थी पर्यंतचे वर्ग मराठी माध्यमातून कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांचा व पालकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सन २००१ साली इयत्ता ५वी ते ७वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. सन २०१० साली पालकांच्या विशेष आग्रहास्तव विद्यालयाने मराठी मध्यामाबरोबर सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले.

प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना याच विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेता यावे म्हणून सन २०१३ साली स्वयं अर्थ सहायित अधिनियम २०१२ अंतर्गत माध्यमिक विभागात इयत्ता ८वी ते १०वी पर्यंतचे वर्ग मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून सुरु करण्यात आले.

मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे एक उत्कृष्ट व दर्जेदार विद्यालय म्हणून या विद्यालयाचा नावलौकिक व्हावा यासाठी संचालक मंडळ आणि शिक्षक यांचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो. त्यामुळेच या लहानशा शैक्षणिक रोपट्याचा आज वृक्ष होताना आपणाला दिसतो.
'इवलेसे रोप लावियले द्वारी! तयाचा वेलू गेला गगनावरी.' असे वर्णन केले तर ते वावगे ठरणार नाही. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कर्तव्याची जाणिव जोपासण्याचा आमचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो.

"||विद्या विनयेन शोभते||"