विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम


शालेय प्रार्थना :

विद्यार्थ्यांच्या विद्यालयातील उपस्थितीनंतर विषय अध्ययनासाठी प्रसन्न मनाने व एकाग्रतेने तयार होण्यासाठी म्हणून प्रार्थना सभागृहात शालेय प्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली जाते. त्यानंतर राष्ट्रगीत, राष्ट्रीय घोषणा आणि प्रसंगानुरूप दैनिक विषय घोषणा दिली जाते. प्रत्येक दिनविशेषानुसार विद्यार्थी व शिक्षक वर्तमानपत्रे आणि ग्रंथालयातील पुस्तकांमधील उपयुक्त माहितीचे संकलन करून परिपाठ सादर करतात.

वार्षिक स्नेहसंमेलन :

करमणूक व आनंद व्यक्त करताना त्यातूनही एखादा सामाजिक संदेश कसा देता येईल त्यानुसार गीत-नृत्याची निवड करून वार्षिक स्नेह संमेलनाचे सादरीकरण केले जाते.

विद्यार्थी संसद निवडणूक :

लोकशाही शासन व्यवस्थेतील निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्पे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतिद्वारा माहीत व्हावेत म्हणून विद्यार्थी संसद निवडणुकीचे आयोजन विद्यालयात केले जाते.

विज्ञान प्रदर्शन :

विज्ञान विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विषय शिकवणे सोपे जाते असे विविध विज्ञान प्रयोग विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना पाहता यावेत आणि विज्ञान विषयात त्यांची अधिक रुची निर्माण व्हावी यादृष्टीने विद्यालयात विज्ञान प्रयोग प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. विज्ञान प्रयोग सादरीकरण करणारे विद्यार्थी प्रयोगाची मांडणी, कृती व त्यातून निघणारा निष्कर्ष याबाबतची माहिती देतात.

शालेय क्रीडा सप्ताहाचे आयोजन :

शरीर सुदृढता, सांघिक भावना, यश-अपयश, सहकार्य करण्याची वृत्ती, तत्परता व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घेणे इ. गुणांची जोपासना खेळामुळे होऊ शकते. त्यामुळेच विद्यालयात दरवर्षी क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले जाते.

शैक्षणिक सहल व क्षेत्रभेट :

पाठ्यघटकांशी संबंधित भौगोलिक, ऐतिहासिक आणि औद्योगिक क्षेत्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्या-त्या विषयाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, त्याचबरोबर पालकांशिवाय प्रवासात स्वतःबरोबर सहकारी मित्रांची कशी काळजी घ्यावी, या विषयीचे ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून देण्याच्या दृष्टीने विद्यालयात दरवर्षी शैक्षणिक सहलीचे व क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते.

सण समारंभ :

प्रत्येक सण-उत्सवाचे औचित्य साधून त्याबाबतची भौगोलिक, वैज्ञानिक व आध्यात्मिक पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना माहीत होण्यासाठी प्रदर्शन व परिपाठाचे आयोजन केले जाते, प्रत्येक जाती/धर्माची शिकवण ही एकच असून त्याची फक्त नावे वेगळी दिली गेल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन विविधतेत एकता कशी जोपासावी, सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना याचे बाळकडू देण्याचा प्रयत्न केला जातो.

विद्यार्थी स्वयंशासन दिन :

विद्यार्थी वर्गात अध्ययन करत असताना कोणी गंभीरतेने अभ्यासाकडे लक्ष देतात, तर बरेच विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतील असे काहींचे वर्तन असते. अशावेळी प्रत्यक्ष शिक्षकाच्या भूमिकेत काम करताना त्यांच्या या वागण्यामुळे अध्यापनावर चांगला/वाईट परिणाम कसा होतो, एखादा विषय शिकवण्यासाठी त्याची किती पूर्वतयारी करावी लागते, विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यावी लागतात, शिकवताना लागणारा आत्मविश्वास इ. विषयांची जाणीव करून देण्यासाठी विद्यालयात इ. ९वी, १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन दिनासारखे उपक्रम राबवले जातात. शिक्षकाबरोबरच, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सेवक, लिपिक इ. व्यक्तींची कामे, जबाबदारी इ. बाबतचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून घेता यावा म्हणून अशाप्रकारच्या उपक्रमाचे आयोजन केले जाते.

सामाजिक उपक्रम :

ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपणही काही देणं लागतो त्यामुळे आपण आर्थिकदृष्ट्या मागास. निराधार लोकांना मदत केली पाहिजे ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून अनाथाश्रम, वृद्धाश्रमास भेटी देऊन मदत करणे, नैसर्गीक आप्पतीमुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न सोडवण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांचे कार्यक्रम विद्यालयात घेऊन त्यांना आर्थिक मदत करणे, वृक्षारोपण करणे, पाणी-वीज बचतीची जनजागृती करणे इ. सामाजिक उपक्रम विद्यालयात राबवले जातात.

स्कुल सिनेमा:

नितीमुल्यांची रुजवण करण्याच्या दृष्टीने पालक, विद्यार्थी व शिक्षक, संस्था पदाधिकारी यांना उपयोगी असतील असे विविध विषयांवरील चित्रपट आणि लघुपट विद्यालयात प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे दाखवले जातात. विद्यालयाने लघुपट दाखवण्यासाठी स्कुल सिनेमा या कंपनीसोबत करार केले आहे.

विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन:

प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, तसेच शिक्षकांनाही विषय अध्यापन करताना येणाऱ्या अडचणी किंवा तो विषय सोप्या पद्धतीने शिकवण्याबाबतचे तंत्रही या विषयतज्ज्ञांकडून शिक्षकांना मिळावे यासाठी लातूर व इतर शहरातील विषयतज्ज्ञांकडून मार्गदर्शनाचे आयोजन केले जाते.