विज्ञानोत्सव: हसत-खेळत विज्ञान


दि. २१ व २२ जानेवारी २०१७ रोजी अभिनव मानव विकास संस्था द्वारा संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या औचित्याने आयोजिलेल्या विज्ञानोत्सवाला विद्यार्थी, शिक्षक तथा पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'आयुका मुक्तांगण विज्ञानशोधिके' चे संचालक अशोक रुपनेर व त्यांचे सहकारी शिवाजी माने यांनी दोन दिवसीय विज्ञान कार्यशाळेत सर्वांना कृतियुक्त मार्गदर्शन केले. दि. २१ जानेवारी २०१७ रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजिलेल्या विज्ञान कार्यशाळेचे उद्घाटन दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रामकृष्ण लड्डा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या उद्घाटन समारंभास मंचावर अ.मा.वि. संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, सचिव कमलकिशोर अग्रवाल, सहसचिव सुभाष कासले , कोषाध्यक्ष जयेश बजाज, संस्थासदस्य डॉ. रमेश जाजू व संजीव भार्गव, रौप्य महोत्सव संयोजन समितीचे प्रमुख अतुल देऊळगांवकर व प्रशाला प्रमुख सुभाष मिश्रा हे उपस्थित होते.
विज्ञानोत्सावाच्या औचित्यानेसमारंभाचे उद्घाटक प्राचार्य रामकृष्ण लड्डा यांनी विद्यार्थी जीवनातील विज्ञानाचे महत्व व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व विज्ञानातील अध्यायानाद्वारे व्यक्तिमत्व विकसन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विज्ञान विषयक संशोधन संस्था, त्याद्वारा राबविले जाणारे विज्ञान विषयक अभ्यासक्रम व शासनाद्वारा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांविषयी विस्तारपूर्वक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाकडेच न वळता विज्ञानातील संशोधनाद्वारे आपले व्यक्तिमत्व विकसित करावे याचे त्यांनी सूचन दिले. दुपारच्या सत्रात पालकांसाठी आयोजिलेल्या विज्ञान विषयक कार्यशाळेचे उद्घाटन दयानंद विज्ञान महाविद्यालयातील डॉ. अजय महाजन यांच्या हस्ते झाले. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील संशोधनाच्या नव्या दिशांची तपशीलवार माहिती दिली.
विद्यार्थ्यांसाठी आयोजिलेल्या या विज्ञान कार्यशाळेत 'आयुका मुक्तांगण विज्ञानशोधिके' चे संचालक अशोक रुपनेर व त्यांचे सहकारी शिवाजी माने यांनी मनोरंजन व प्रबोधन यामाध्यमातून विद्यार्थ्यांशी विज्ञान विषयक वैविध्यपूर्ण संशोधन व कृतीकार्यक्रम या अनुषंगाने मुक्त संवाद साधला. विज्ञान विषयक सिंधांताला कृतीरूप देण्यासाठी त्यांनी सभोवती उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तूंचा अतंत्य कौशल्यपूर्ण रीतीने त्यांचा उपयोग केला. विद्यार्थ्यांनी विज्ञान शिकताना कृतीशिलतेचे पाठ घ्यावेत म्हणून उभयतांनी छोटे-छोटे प्रयोग करून विद्यार्थ्यांचे लक्ष प्रयोगाकडे आकृष्ट केले. या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी विज्ञान विषयक संशोधनात कोणतेही चमत्कार नसून केवळ कार्यकारण भावाचाच संबंध असतो हे शास्त्रीय सत्य उलगडून दाखवले. 'Do Flowers Fly?' या सांर्द्रध्वनीद्वारा(CD) त्यांनी विद्यार्थ्यांना कालीकाविकासन्यायानुसार उमलू द्यावे याचाही संदेश दिला. या विज्ञान कार्यशाळेचे प्रास्ताविक रौप्य महोत्सव संयोजन समितीचे प्रमुख अतुल देऊळगांवकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुरेखा भोसले यांनी तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजेंद्र लातूरकर यांनी केले. या विज्ञान कार्यशाळेसाठी शहरातील अनेक विद्यालयातील विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक, निमंत्रित, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशाला प्रमुख सुभाष मिश्रा, उपमुख्याध्यापक राजेंद्र लातूरकर, पर्यवेक्षकत्रय गिरीश कुलकर्णी, विजया कुलकर्णी व संजय क्षीरसागर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

दि. २२ जानेवारी २०१७ रोजी शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन लातूरमधील कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत पाटील यांनी मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमापूजनाने केले. 'विज्ञानोत्सव-हसतखेळत विज्ञान' या कार्यशाळेसाठी मंचावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, सहसचिव सुभाष कासले, कोषाध्यक्ष जयेश बजाज, डॉ. रमेश जाजू, मुख्याध्यापक सुभाष मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेस लातूर शहरातील २२ खाजगी अनुदानित शाळातील ४६ शिक्षक, लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळातील ६४ तर खाजगी शिकवणी वर्गाचे एक असे एकूण १११ शिक्षक उपस्थित होते. या सर्व सहभागी शिक्षकांना डायरी, पेन, विज्ञान प्रयोगविषयक साहित्य, अभिप्राय नोंदवण्यासाठीचे साहित्य व छापील प्रश्नावलीचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम एकूण पाच तास चालला. त्यापैकी किमान चार तासाहून अधिक वेळ अशोक रुपनेर व त्यांचे सहकारी शिवाजी माने यांनी उपस्थित शिक्षकांना प्रात्यक्षिकासह अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. स्लाईड शो, डिजिटल इ-लर्निंगच्या च्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. अशोक रूपनेर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले, की विज्ञान हा विषय खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या आवडीचा कसा होईल, यासाठी संबंधित विषय शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, सध्यस्थितीत तसा प्रयत्न होताना दिसत नाही. विद्यार्थ्यांना टाकावू वस्तूपासून टिकावू वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवताना विद्यार्थ्यांची विज्ञान शिकण्याची ओढ व आवड आपणास दिसून आल्याचे सांगून त्यांनी उपस्थित शिक्षकांना विज्ञानविषयक अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा , सचिव कमलकिशोर अग्रवाल, सहसचिव सुभाष कासले , कोषाध्यक्ष जयेश बजाज,डॉ. रमेश जाजू, रौप्य महोत्सव संयोजन समितीचे प्रमुख अतुल देऊळगांवकर यांसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुभाष मिश्रा, उपमुख्याध्यापक राजेंद्र लातूरकर , पर्यवेक्षक सौ. विजया कुलकर्णी , गिरीश कुलकर्णी , संजय क्षीरसागर यांसह सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.