विद्यालयातील भौतिक सुविधा


शालेय इमारत :

संस्थेने सुरुवातीच्या काळात शाळेसाठी स्वतंत्र २ एकर जागा खरेदी करून, इ.स. २००० मध्ये या जागेवर पक्क्या स्वरूपात दोन मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. ही इमारत अष्टकोनी स्वरूपाची असून या इमारतीमध्ये सध्या इयत्ता बालवाडी ते चौथीपर्यंतचे वर्ग चालवले जातात.
वर्गखोल्यांची कमतरता, वाढीव विद्यार्थी आणि वर्ग तुकड्यांची संख्या पाहता संस्थेने उपलब्ध जागेत तीन मजली नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. या इमारतीमध्ये सध्या इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग चालवले जातात.

प्रशस्त वर्ग खोल्या व फर्निचर :

विद्यालयाच्या इमारतीत एकूण ३५ वर्गखोल्या आहेत. प्रत्येक वर्गखोल्यांमध्ये तीन ट्यूब, दोन फॅन व उत्तम लेखनफलकाची(White Board) सुविधा उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना सुलभतेने अध्ययन व लेखन करता यावे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा वयोगट याचा विचार करून, इयत्ता बालवाडी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आकाराचे फर्निचर उपलब्ध करून दिले आहे.

क्रीडा मैदान व वाहनतळ:

विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाद्वारा त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी विद्यालयात क्रीडा मैदानाची सोय उपलब्ध आहे. क्रीडा प्रकारासाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे क्रीडा साहित्य उपलब्ध आहे. या साहित्याचा उपयोग करून क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना देशी-विदेशी खेळांचे शिक्षण देतात. विद्यालयात विद्यार्थी व कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे.

संगणक कक्ष :

संस्थेने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार एक अद्ययावत संगणक कक्ष उपलब्ध करून देऊन, त्यात एकूण ४२ संगणक संच असून याद्वारा इ. १ली पासून ते इ. १०वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना नियमितपणे संगणकाचे प्रशिक्षण हे दोन प्रशिक्षित संगणक शिक्षकाद्वारा वेळापत्रकाप्रमाणे दिले जाते. या संगणक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांतर्गत कम्प्युटर मस्ती, आय.आय.टी., पवई यांच्याद्वारे घेतला जाणारा संगणकीय अभ्यासक्रम शिकविला जातो. विद्यार्थ्यांना या संगणक कक्षात शिक्षकांच्या मार्गदर्शनावर आधारित इंटरनेट (Internet) वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

ई-लर्निंग क्लासरूम :

विद्यालयात प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल ई-लर्निंग क्लासरूमची सुविधा उपलब्ध असून प्रत्येक वर्गामध्ये खालील साधनांचा समावेश आहे:
1. Specktron DVT 82 Interactive (Touch Screen) Smartboard
2. BenQ Short Throw Projector with Smart Eco Technology
3. High Performance CPU ( Computer System )
4. Digital 5.1 Channel Surround Speaker System
या दृकश्राव्य साधनांच्या मदतीने शाळेतील इयत्ता बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केलेल्या पाठ्यक्रमाचे मार्गदर्शन ई-लर्निंग सॅाफ्टवेअरद्वारे केले जाते. दृकश्राव्य स्वरूपात मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढते व अध्ययन क्षमता दृढ होण्यास मदत होते. विद्यालयाने ई-लर्निंग सॅाफ्टवेअरसाठी "TATA CLASS EDGE" सोबत करार केला आहे.
त्याचबरोबर प्रत्येक वर्गामध्ये इंटरनेट (Internet) वापरण्याची सुविधा उपलब्ध असून त्याद्वारेही विद्यार्थ्यांना शिकविलेल्या पाठाबद्दल अधिक ज्ञान व ताज्या घडामोडींची माहिती दिली जाते.

सेमिनार हॉल :

विद्यालयात स्वतंत्र सेमिनार हॉल उपलब्ध असून यात दृक्श्राव्य साधनाच्या मदतीने शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण दाखविले जातात. या दृक्श्राव्य साधनांच्या मदतीने संगणकाद्वारे वेगवेगळी मार्गदर्शन शिबिरे घेतली जातात.

विज्ञान प्रयोग शाळा :

विद्यालयामध्ये स्वतंत्र विज्ञान प्रयोगशाळा कक्ष उपलब्ध असून, या प्रयोगशाळेत सामान्यत: इ. ४थी ते १०वी पर्यंतच्या वैज्ञानिक प्रयोगासाठी आवश्यक प्रयोग साहित्य आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत. या प्रयोग शाळेत नियमितपणे विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रयोग करवून घेतले जातात.

सौर उर्जा निर्मिती व उपयोग:

विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सामाजिक मुल्यांची रुजवण करण्याचाही प्रयत्न केला जातो. याचाच एक भाग म्हणून वीज बचतीचा संदेश विद्यार्थी व पालकांपर्यंत कृतीतून पोहोचविण्यासाठी संस्थेने विद्यालयात सौरउर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. १५ KW क्षमतेच्या या प्रकल्पाची उभारणी अतिशय गतीने आदित्य सोलार एनर्जी प्रा. लि. या संस्थेतर्फे करण्यात आली. या सौरउर्जा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन दयानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, आ.मा.वि.संस्थेचे माजी सचिव मा. श्री. के. एच. पुरोहित सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा उपयोग विद्यालयातील ई-क्लासरूम चालविण्यासाठी केला जातो. या प्रकल्पामुळे विद्यालयाच्या मासिक वीजबिलात मोठ्याप्रमाणात बचत होत असून विद्यार्थ्यांना अखंडितपणे ई-लर्निंगद्वारे अध्ययन करता येत आहे.

समृद्ध ग्रंथालय :

विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती, संकलनवृत्ती आणि ज्ञानवृद्धी वाढीस लावण्याच्या हेतूने विद्यालयाच्या ग्रंथालयात प्रामुख्याने ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, शब्दकोश, मासिके आणि इतर विषयांची एकूण ३२५० पुस्तके उपलब्ध आहेत. ही पुस्तके नियमित ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ग्रंथपालद्वारा विद्यार्थी आणि शिक्षकांना घरी वाचनासाठी दिली जातात.
वृत्तपत्रांची उपलब्धता : विद्यालयात नियमितपणे मराठी, हिंदी या भाषेतील एकूण सहा वृत्तपत्रे, शैक्षणिक मासिके व नियतकालिके नियमितपणे मागविली जातात. यामध्ये येणारी शालेय अभ्यासक्रमाबाबतची पूरक माहिती याचे संकलन शिक्षकांद्वारा केले जाते.

सांस्कृतिक सभागृह :

एकूण १००० विद्यार्थी एकाच वेळी बसू शकतील एवढ्या क्षमतेचा भव्य सांस्कृतिक सभागृहाची व्यवस्था विद्यालयात उपलब्ध असून या सभागृहात दररोजच्या सामूहिक प्रार्थनेबरोबरच विद्यार्थी व शिक्षकांद्वारा वेगवेगळे सांस्कृतिक व शैक्षणिक परिपाठ विद्यार्थ्यांसमोर सादर केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होते.

शिक्षक/शिक्षिका कक्ष :

विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षिका यांना त्यांच्या रिक्त तासिकांच्या वेळेत त्यांची शैक्षणिक कार्ये करता यावीत यासाठी त्यांना स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला आहे.

शुद्ध पेयजल व्यवस्था :

अशुद्ध व क्षारयुक्त पाणी पिणे हे सर्वांसाठी अपायकारक असते याबाबीचा विचार करून संस्थेने विद्यार्थ्यांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यालयामध्ये उच्च गुणवत्तेचे जलशुद्धीकरण संयंत्र बसविण्यात आले. विजेवर चालणाऱ्या या संयंत्रातून उपलब्ध झालेले शुद्ध पाणी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक मजल्यावर उपलब्ध करून देण्यात आले. उन्हाळ्याच्या काळात विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शुद्ध-थंड पेयजलाची गरज लक्षात घेता विद्यालयात वॉटर कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी इमारतीच्या प्रत्येक भागात शुद्ध व शीत पेयजलाची व्यवस्था उपलध आहे.

स्वच्छतागृह व्यवस्था :

दोन्ही इमारतींच्या प्रत्येक मजल्यावर मुलां-मुलींसाठी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व गरजू विद्यार्थांसाठी कमोडची व्यवस्था केली आहे. सर्व स्वच्छतागृहामध्ये मुबलक सांडपाण्याची व्यवस्था असून त्याची नियमित साफसफाई संबंधित कर्मचाऱ्यांकडून केली जाते.

लघुसंदेश प्रणाली (SMS) सुविधा :

विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे दररोज लघुसंदेश प्रणालीद्वारे SMS पाठविले जातात. तसेच याद्वारा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे गुण, शुभेच्छा आणि वेगवेगळ्या सूचनांचे संदेश पाठविले जातात.

सी.सी.टी.व्ही. कॅमेरा :

विद्यालयातील विद्यार्थी आणि शैक्षणिक साहित्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक वर्गात, इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर, सभागृह, क्रीडा मैदान इ. ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्याचे थेट प्रक्षेपण मुख्याध्यापक कक्षामध्ये दिसावे यासाठीची सोय उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थी शिस्त व सुरक्षितता यासाठी याचा उपयोग केला जात आहे.